औरंगाबाद- महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात आणि औंरगाबाद स्मार्ट सिटी व्हावी असे व्हीजन ठेवत, केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महापौर नंदकुमार घोडेले तसेच पदाधिकाऱ्यांना स्वप्न दाखविले. यावेळी गडकरींनी शहराच्या सिटी बस तसेच धूर सोडणाऱ्या चारचाकी वाहनांचे दाखले देत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. औरंगाबाद एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित सुक्ष्म सिंचन परिषदेच्या निमित्ताने ते बोलत होते.
ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा जागतिक पातळीवर एक वेगळे नावलौकीक आहे. येथील नागरिकांच्या मुलभूत सुविधांविषयीचा आढावा गडकरींनी महापौर घोडेलेंकडून घेतला. औरंगाबाद हे शहर स्मार्ट सिटी व्हावे यासाठी एका खासगी संस्थेमार्फत उपस्थितांना माहिती दिली. शहरातील वाहतूकीवर नियंत्रण रहावे तसे नागरिकांना उच्च श्रेणीच्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई, पुणे, नागपूरच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही मेट्रो रेल्वे तसेच रोप-वे व्हावे यासाठी तातडीने आराखडा तयार करावा अशा सूचना त्यांनी महापालिकेचे महापौर, उप-महापौर, आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.केंद्र व राज्य सरकारच्या भागिदारीतून औरंगाबाद शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी मेक इन इंडीया हे स्वप्न पूर्णत्वास जाण्यासाठी गडकरींनी आपल्या खात्यामार्फत मदतीची तयारी दर्शविली.